१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत होणार शोध मोहीम
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्यूरो): जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत २६७कुष्ठरुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले आहे.
या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्या २५ लाख ६ हजार २२१ व शहरी लोकसंख्या ४ लाख ३५ हजार ३२९ मिळून एकूण २९ लाख ४१ हजार ५५० लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण २२५४ पथके स्थापन करण्यात आले असून ४५०८ कर्मचारी तसेच ४५० पर्यवेक्षक त्यात सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. कांचन वानोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, सहायक संचालक
(कुष्ठरोग) डॉ. शिवकुमार हालकुडे आदी यावेळी उपस्थित होते. कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्री या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, परिधीय नसा, डोळे आणि शरीरातील काही अवयवांवर त्याचा परिणाम होतो.
या आजारासंदर्भात अशी आहेत लक्षणे :
त्वचेवर फिकट, लालसर, बधिर चट्टे, त्या ठिकाणी धाम कमी योगे, त्वचेवर जाऊ, बधिर, तेलकट व चमकदार ठिपके गाठी किंवा पॅचेस, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्णपणे न मिटणे, हात-पायामध्ये मुंग्या येणे, बधिरपणा, पायावर, तळहातावर जखमा, हात-पायाची बोटे वाकडी होणे, हात किंवा पाय लुळा पडण, अशक्तपणा, हातातून वस्तू गळणे, चालताना चप्पल गळून पडणे. अद्यापही भीती, गैरसमज आणि भेदभाव टिकून आहेत. वेळेत निदान आणि संपूर्ण औषधोपचार हे कुष्ठरोग नियंत्रणाचे प्रमुख घटक असल्याचे आरोग्य विभागाने या वेळी स्पष्ट केले आहे.














